पुरुषोत्तम मास निमित्त विशेष शृंखला
भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी यांनी वेळोवेळी भक्त/ जन रक्षणार्थ वेगवेगळे अनेक अवतार घेतलेले आहेत. श्री ब्रम्हदेव हे या जगाचे रचयिता, श्री शंकर भगवान हे उद्गारकर्ता आणि श्री विष्णु भगवान हे पालनकर्ता आहेत. श्री ब्रम्हदेवाने आणि श्री शंकरदेवाने जग कल्याणासाठी अवतार घेतले नाहीत, परंतु श्री विष्णु देवाने भक्त/ जन रक्षणार्थ अनेक अवतार घेतले आहेत.
श्री विष्णूच्या या षोडश नाम स्तोत्रामध्ये, श्री विष्णूने भक्त आणि जन कल्याणार्थ व रक्षणार्थ घेतलेल्या १६ अवतारांची नावे आली आहेत. म्हणून या स्तोत्राला श्री विष्णु षोडषनाम स्तोत्र असे नाव पडले आहे. निरनिराळ्या संकट प्रसंगी या स्तोत्र पठणाचे महत्व आहे.
दर गुरुवारी या श्री विष्णु षोडश नाम स्तोत्राचे मनोभावे पठण करतो त्याचे कुंडलीतील बृहस्पती संबंधित दोष सुद्धा निवारण होतात.श्री विष्णु षोडशनाम स्तोत्र व त्याचे महत्व दिनांक: २५ जुलै,२०२३ रोजी सकाळी ११ वाजता आदरणीय सौ माधवी जोशी यांच्या कडून श्रवण करणार आहोत.
सिध्द साधक साधना परिवार देखील आपल्या साधकांच्या अध्यात्मिक प्रगती साठी संपूर्ण अधिक मास भगवान विष्णू यांची विविध उपासना, स्तोत्रे, कथा मांडणार आहोत. अनेक ज्येष्ठ आणि विद्वान साधका कडून आपल्याला आजच्या काळाशी सुसंगत असे मार्गदर्शन भेटणार आहे. आपण देखील या संधीचा उपयोग कराल अशी आशा आहे. आपल्याला आमचा उपक्रम आवडत असतील तर कृपया आमच्या इतर उपक्रमाला फॉलो करा आणि आपल्या मित्र परिवाराला देखील आमच्या उपक्रम बद्दल सांगा.
॥ श्री विष्णु षोडश नाम स्तोत्र ॥
आपण सर्वांना पुरुषोत्तम मासाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥
शांतीचा अर्थ - [पूर्णं अदः] - तें परब्रह्म पूर्ण आहे. [पूर्णं इदं] - हे सोपाधिक ब्रह्महि स्वरूपानें पूर्ण आहे. [पूर्णं पूर्णात् उदच्यते] - ते हे कार्यात्मक ब्रह्म पूर्ण म्हणजे कारणात्मक ब्रह्मापासून उद्भवते. पण ते त्याच्यापासून जरी निराळें होत असलें तरी आपले पूर्णत्व सोडीत नाहीं. तर ते पूर्णच उद्भवते. [पूर्णस्य पूर्णं आदाय] - कार्यरूप ब्रह्माचे पूर्णत्व घेऊन [पूर्ण एव अवशिष्यते] - पूर्णच-केवल ब्रह्म-अवशिष्ट राहतें. म्हणजे सृष्टीच्या पूर्वीं जें अखंड एकरस सर्वव्यापी ब्रह्म होतें तेंच हे सृष्टीनंतरचें नामरूपोपाधियुक्त कार्यब्रह्म आहे. पण तेहि पूर्ण आहे. त्या कारणरूप पूर्णापासून हें कार्यरूप ब्रह्म पृथक् आहे, असें भासू लागते. प्रलयसमयीं त्या द्वैतरूप कार्यब्रह्मांतील पूर्णत्व तेवढें घेऊन म्हणजे पूर्णत्व हा आपला धर्म त्यांतून काढून घेऊन तें पहिलें कारणरूप ब्रह्मच अवशिष्ट राहते. त्रिविध तापांची शांति होवो.
ॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥ १ ॥
अखिल ब्रह्माण्डात जे काही जडचेतनस्वरूप जग आहे, ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे. भगवस्वरूप म्हणूनच त्याचा अनुभव घ्यावा. त्या ईश्वराला साक्षी ठेवून त्यागपूर्वक उपभोग घ्यावा म्हणजे पालन व रक्षण करावे. धन म्हणजे भोग्य पदार्थ कुणाचे आहेत ? (अर्थात् ते कुणाचेही नाहीत).
हे चराचर विश्व ईश्वररूप आहे, अशी दृढ भूमिका झाली की कर्तृत्वच आणि भोक्तृत्व या दोहींचाही (म्हणजे 'मीच हे स्वपराक्रमाने निर्माण केले आणि मीच त्यांचा उपभोग घेणार' हा अहंकार) मानवी अहंकार नाहीसा होतो. मानवाच्या तीन प्रकारच्या तीव्र इच्छा (एषणा) आसक्ती होतात. मानवी अहंकार नाहीसा होतो. लोकेषणा (कीर्ती व मानसन्मानाचा हव्यास), धनेषणा (ऐश्वर्याचा हव्यास) आणि दारेषणा (उपभोगांचा हव्यास) या त्या तीन एषणा होत. सर्व ईश्वरमय आहे, या भावनेने मानवाच्या मनातील ममता व आसक्ती हळूहळू नाहिशी होते. आपले प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करावयाचे आहे, हा मनातील भाव दृढावतो. नामरूपात्मक जग विकारी आणि विनाशी असून त्या पलिकडील अविनाशी आत्म्याचा प्रत्यय येतो.